Dec 5, 2010
आभास भास
आजूबाजूचे जग वेगाने बदलत असल्याचे दिसते. आपण मात्र तसेच आणि तिथेच असतो..तीच दिनचर्या तोच रोजचा व्यवहार.. आपल्यासाठी घडाळ्याचे काटे फिरत राहतात आणि आपण फक्त त्याकडे पाहात राहतो. बरोबरीच्या मुसाफिरांची गाडी प्रवासातली अर्धी स्टेशन्स पार करत भरधाव धावत असते, आपली गाडी मात्र अजून जिथून सुटणार त्या फलाटावरच विसावलेली असते! वाट पहात...धीर धरत..स्वतःचे सांत्वन करता करता, वेळ येण्याची वेळ कधी येणारच नाही अशी कुणकुण वाटायला लागते. आपण चुकीच्या गाडीत बसलोय का अशी शंकाही वाटायला लागते. इतरांची त्यांच्या वेगवान आयुष्याशी जुळवून घेता घेता दमछाक होत असते. आपल्या आयुष्याची गाडी तर अजून वेगच घेत नसते! संभ्रमाचे आणि निराशेचे काळे ढग मनात दाटून येतात...तरी फरक मात्र काहीच पडत नाही...सारे तसेच ..स्तब्ध...साचलेल्या पाण्यासारखे...हळू हळू भावनाही गोठायला लागतात...हे सारे दु:स्वप्न असल्याचा भास मनाला होतो आणि ह्या भासाचा आभास हुळहुळणाऱ्या मनावर आशेची फुंकर घालतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment