Jun 16, 2011

आधुनिक वटपौर्णिमा

पूजा..पानावर मिळणारे ५ फळांचे वाण... वटवृक्षाच्या डेरेदार सावलीखाली जमलेला गोतावळा.. ह्या वट-पौर्णिमेच्या बालपणीच्या आठवणी..आता त्यांची जागा बंदिस्त घरात पुजल्या जाणार्या मरगळलेल्या फांदीने घेतली आहे. खरे पाहता सावित्रीच्या पुण्याईचा आधार घेत असंख्य जीवांना सावली देणाऱ्या, पाखरांना घरट्यासाठी जागा देणाऱ्या आणि भरपूर प्राणवायू देणाऱ्या वडाच्या झाडाशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी पूर्वजांनी निर्मिलेला वट-पूजेचा सोहळा आता त्या वटवृक्षाच्या छाटणीचे कारण झालेला दिसून येतो! परंपरांच्या आंधळ्या वाटचालीचे याहून योग्य उदाहरण सापडणे विरळाच! आपल्या नवर्याच्या दीर्घायुष्याची मागणी करताना इतर अनेक जीवांच्या आयुष्याचा आधार आणि खुद्द ज्या झाडाकडे आपण मागणी करत आहोत त्याचा जीवच आपण काढून घेत आहोत ह्याची पुसटशीही जाणीव त्या सौभाग्यवतींना होत नसेल का? ह्या सगळ्या संभ्रमित वातावरणातही विक्रम सारखे काहीजण पुढे येऊन plant -rescue -group ची स्थापना करतात तेंव्हा त्यांचे कौतुक नक्कीच व्हायला हवे. विक्रम हा ताज हॉटेल मधील बगीचाचा in -charg म्हणून काम करतो. एका वट-पौर्णिमेला आईला तोडलेल्या वडाच्या फांदीची पूजा करताना पाहून तो उद्विग्न झाला. त्याने आईला केवळ तसे करण्यापासून परावृत्तच नाही केले तर गच्चीवर तण म्हणून उगवलेल्या वडाची यथासांग लागवड करून देऊन तिच्या पूजेची सोय करून दिली. ह्या घटनेतूनच जन्माला आली plant -rescue -group ची कल्पना. पाइपांच्या बेचक्या, छ्ज्जांचे कोपरे, कुंपणाच्या भिंती अशा अडनिड्या जागी आलेल्या झाडांना तिथून काढून त्यांची यथायोग्य लागवड करण्याचे काम हा group  करतो.  आता तर महानगरपालिकेने ह्या संघटनेच्या कार्याला मान्यता देऊन त्यांना रोपवाटिकेसाठी जागासुद्धा मंजूर केली आहे. ह्या संघटनेची शहरी भागातील हिरवळ वाचविण्याची आणि वाढविण्याची हि कामगिरी म्हणजे वटपौर्णिमा साजरी करण्याची आधुनिक पद्धत म्हणता येणार नाही का..  

1 comment: