Nov 7, 2010

आत-बाहेर

बाहेर एक जग आणि आतमध्ये एक... बाहेरच्या कोलाहलाचा, तक्रारींचा, गोंधळ- गडबडीचा कंटाळा आला की मी फक्त आतल्या जगामध्ये गुंतून जाते, स्वतः भोवती एक अदृश्य कोश गुंफून...बाहेरच्या जगापासून अलिप्त. कोशातल्या अळीप्रमाणे काही वेळ कोशात घालविल्यावर माझेसुद्धा स्वच्छंदी आणि रंगीबेरंगी फुलपाखरू होईल ह्या आशेने... आतल्या जगात असते केवळ मनाची सत्ता! एव्हड्या जवळून मनाला पाहिल्यावर त्याचेही रंग दिसू लागतात. कधी आनंदी तर कधी नाराज.. कधी भावूक तर कधी पाषाणहृदयी... कधी शांत तर कधी वाऱ्याहूनही लहरी... कधी मायेची हळुवार फुंकर घालणारे तर कधी शत्रूही देणार नाही इतके शिव्या-शाप देणारे! हे पाहून वाटते बाहेरचा गोंधळ ह्या आतल्या गोंधळापेक्षा काही वेगळा थोडाच आहे?!  मग हा कोशाचा अट्टाहास फोलच ठरला तर!  समष्टी आणि व्यष्टीचे एकमेकांत असलेले प्रतिबिंब हा असा कुठलाही कोश मिटवू शकणार नाही... आपण फक्त त्यांची सांगड घालायचा प्रयत्नच करू शकतो.

No comments:

Post a Comment