Oct 9, 2010

नवा सूर

समोर अफाट पसरलेला समुद्र खुणावणारा;


नुकतीच पोहायला शिकलेली मी.

नव्याने शिकलेले आणि घरच्या कुंडात आजमावलेले पोहण्याचे तंत्र समुद्राची ओढ वाढवणारे.

मनात विचारांची उचनीच आणि आकाशाला भिडणाऱ्या आकांक्षा घेऊन मी काठावर उभी आहे;

समोरच्या अथांगाच्या थांगाचा अंदाज घेत.

डोळ्यांत स्वप्न आहे एखाद्या मत्स्यकन्येप्रमाणे दूरवर सूर मारून लाटांवर राज्य करण्याचे.

त्याचबरोबर पायांत अदृश्य बेडी आहे ह्या समुद्री जगाविषयी ऐकलेल्या उलट-सुलट दंतकथांची.

समुद्रातल्या राजांची अचाट सत्ता, स्वच्छंदी विहरणाऱ्या मत्स्यकन्यांच्या लीला आणि दैत्यासम शार्क मास्यांचे हल्लेसुद्धा!

तरीही मनातली आशा आत्मविश्वास देते..समोरच्या प्रवाहात स्वतःला झोकून देण्याचा;

साम्राज्य नाही पण राज्य प्रस्थापित करण्याचा.

देवमासा बनण्याची इच्छा नाही पण कुशलतेने मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या मास्यांच्या एखाद्या गटाचे नेतृत्व करण्याची हौस आहे!

विचारांची सांगड घालत चारच पावले पुढे पाण्यात गेले, मात्र लाटांनी पायाखालची वाळूसुद्धा टिकू दिली नाही!

दबकत दबकत सूर मारत आहे. लाटांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत.

आजूबाजूला नव्या जगातल्या नियमांचा उलगडा करणाऱ्या घडामोडी दिसत आहेत. त्यातल्या काही प्रेरणादायक तर काही धक्कादायक!

देवाण-घेवाण हीच गरज, हाच कायदा; प्रत्येक क्रियेमागे.

ह्या कायद्याच्या गणिताने मित्र, शत्रू, हितचिंतक आणि इतरहि सगळ्या गोतावळ्याची समीकरणे आपणच मांडायचीही आणि सोडवायचीही!

नवा खेळ आहे, खेळण्याची इच्छा आहे ...ज्याने इच्छा दिली त्याच्या विश्वासावर जिंकण्याची खात्री आहे.

No comments:

Post a Comment