Oct 17, 2010

नवरात्री निमित्ते...

    नवरात्रीतील अष्टमी हा वर्षातल्या त्या काही मोजक्या दिवसांमधला एक, ज्या दिवशी मी घरच्यांबरोबर ठरलेल्या देवळांत जाते. ह्या वर्षीसुद्धा पायंड्याप्रमाणे office नंतर अंबामातेच्या देवळात यायचे फर्मान मातोश्रींकडून आले. मी आई-बाबांपेक्षा लवकर पोहोचले. मंडपात एका बाजूला बसून आजूबाजूची गर्दी न्याहाळू लागले. अष्टमीच्या मुहूर्तावर देवळात अलोट गर्दी होती..ती म्हणा मुंबईत हल्ली सगळीकडेच असते, कारणाशिवायाही. ओटी भरणार्यांची रांग वेटोळे घेत घेत पार बाहेरच्या रस्त्यापर्यंत पोहोचली होती. मंडपात येणार्या प्रत्येकाची थोड्या फार फरकाने एकच पद्धत ... पायरीला नमस्कार, घंटा, देवीला नमस्कार, कपाळी कुंकू, साष्टांग नमस्कार, इत्यादी...सर्व काही दरवर्षीच्या नियमाने आणि सरावाने अंगवळणी पडलेले सोपस्कार. कितीजण आपण काय करतो आहोत, का करतो आहोत ह्याचा जागरूकपणे विचार करत असतील याची शंका यावी असेच बरेचसे वातावरण.
    परकर-पोलके घातलेली एक गोड चिमुरडी आई आणि आजी बरोबर देवळात आली होती. आजी जे जे काही करेल ते नि:शंकपणे आणि आनंदाने copy करत होती. तिच्या ह्या copy भक्तिभावाने खूष झालेल्या एका आजोबांनी तिची पाठ थोपटली आणि त्यामुळे तिच्या चेहर्यावर निरागस आनंद उमटला. अशाच काहीश्या संस्कारांतून आणि प्रोत्साहनातून कदाचित आंधळेपणाने प्रथा पाळणारी आजूबाजूची गर्दी लहानाची मोठी झालेली असेल!
    ह्या गर्दीपैकी फक्त लहान मुलांच्याच चेहर्यावर आनंद दिसत होता. जो वास्तविक देवीच्या दर्शनाने सगळ्यांच्याच चेहर्यावर दिसायला हवा होता! मात्र बरेचसे चेहरे गर्दीत उभे राहून त्रासलेले, आपल्या आयुष्यातल्या गार्हाण्यांचे ओझे कधी एकदा देवीसमोर मांडून मोकळा होतो याची घाई असलेले असेच होते. आनंद असलाच तर तो आजच्या दिवसासाठी ठरलेले हे दर्शनाचे काम एकदाचे पूर्ण झाले ह्याचाच असावा बहुदा. आईच्या दर्शनाने होणारी निर्विकार प्रसन्नता कुठेच दिसली नाही! असे हे गर्दीतले लहान-मोठे, विविधरंगी चेहेरे-मोहोरे बघण्यात माझा छान विरंगुळा झाला. काही ओळखीची मंडळीसुद्धा भेटली. त्यानंतर आम्ही आरे कॉलोनीतल्या देवळात गेलो. ह्या देवळात आम्ही लहानपणी ऐन परीक्षा असतानाही न चुकता गरबा आणि दांडिया खेळायला जायचो. तेंव्हा बहुतेक दांडिया आणि stick-war यांत गल्लत होत असावी. त्याचा परिणाम म्हणून प्रतिपक्षाची टिपरी जोरदार आघात करून मोडून टाकणे किंवा ती हातातून सुटून खाली पाडणे, नेम चुकून टिपरी समोरच्याच्या हातावर किंवा डोक्यावर बसणे इत्यादी छोट्या-मोठ्या उचापती होत आम्ही जवळ जवळ ३ ते ४ तास घामाने डबडबून जाईपर्यंत मनसोक्त उद्या मारत असू; म्हणजेच आमचा दांडिया खेळत असू. त्या सगळ्या आठवणी गरब्याच्या तालावर जाग्या झाल्या. देवळासमोरच्या अंगणात मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना केलेली होती आणि तिच्यासमोर होमकुंड धगधगत होता. त्याभोवती फेर धरून गरबा चालू होता. कुंडावर जवळ जवळ एका माणसाच्या उंची एवढा नारळांचा ढीग झाला होता. तसाच धगधगणारा होमकुंड आणि नारळातून उठणाऱ्या धुराचा तोच सगळीकडे पसरलेला वास... इतक्या सगळ्या वर्षांत ह्या सगळ्यांत काहीच फरक झालेला नाही. कदाचित मी बघायच्या आधीही कित्येक वर्षांपासून तो दरवर्षी तसाच आहे. तो तसाच राहील आणि रहावा यात दुमत नाही. मात्र ह्या प्रथा केवळ आंधळ्या प्रथा न रहाता त्यांकडे डोळसपणे आणि जाणीवपूर्वक बघण्याची सवयही आपण अंगवळणी पाडायला सुरुवात करायला हवी.

No comments:

Post a Comment