Oct 10, 2010

हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडेंचे लेखन फक्त पाठ्यपुस्तकातून वाचनात आले होते. त्यांच्या 'कोसला' मधील एक उतारा अंधुकसा माहित होता. एका रविवारी tv वर channel surfing करत असताना अचानक नेमाडेंची मुलाखत दिसली आणि त्यांची नवीन कादंबरी 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळाली. ह्या कादंबरीसाठी नेमाडेंनी ३७ वर्षे काम केले! हे ऐकून आणि एकंदरीतच सांस्कृतिक बाबतींत रुची असल्याने, सवलतीच्या दारात प्रकाशनपूर्व प्रत नोंदवूनही टाकली. थोड्याच दिवसांत खुद्द नेमाडेंची स्वाक्षरी असलेली प्रत हातात पडली आणि कादंबरीचा नायक खंडेराव याच्याबरोबर माझा समृद्ध, व्यापक हिंदू संस्कृतीचा मोहेंजोदाडो ते नायकाचे मराठवाड्यातील गाव मोरगाव इथपर्यंतचा प्रवास सुरु झाला. नाव जरी हिंदू असले तरी त्याचा संबंध धर्माशी नसून संस्कृतीशी जोडलेला आहे. खंडेराव पुरातत्व संशोधक आहे आणि त्या निमित्ताने ह्या एवढ्या व्यापक संस्कृतीचा पसारा एका धाग्याने बांधून जवळ आणणे त्याला शक्य झाले. सामान्य माणसांच्या जगण्यातल्या, गटांतल्या, समाजातल्या छोट्या छोट्या बाबी संस्कृतीला किती मोठे आणि गहिरे रंग आणि आकार देतात, एक व्यापक स्वरूप देतात हे जाणवण्याचे सुंदर साधन म्हणजे हे पुस्तक. आज कादंबरीचे शेवटचे पान उलटताना...अजून काही बाकी आहे ह्याची तीव्र जाणीव झाली...आणि ह्या कादंबरीचे अजून दोन खंड येणार आहेत ह्याची आठवण झाली....आशा आहे खंडेराव लवकरच भेटेल...संस्कृती विशेषतः हिंदू संस्कृती सारखी, अगदीच योग्यरीतीने बोलायचे झाले तर हिंदुस्थानाच्या संस्कृतीसारखी क्लिष्ट, गुंतागुंतीची गोष्ट उलगडण्याची कामगिरी नेमाडेंनी किती कौशल्याने पेलली आहे!

No comments:

Post a Comment