Oct 26, 2010
विरह...
त्याच्यावर मी कधी प्रेम करायला लागले माहित नाही. जेंव्हा पासून स्मृती आहे तेंव्हापासूनच्या त्याच्या प्रीतीच्या आठवणी आहेत! कदाचित हि ओढ स्मृतींच्या जन्माच्या आधीपासूनची आहे! त्याच्या नुसत्या स्मरणाने चैतन्याची लहर सळसळते! त्याच्या येण्याने जीवाच्या दाहावर चंदनाचा लेप चढतो. साऱ्या चराचराची क्षुधा शमविण्याचे ज्याचे सामर्थ्य त्याच्या त्या बरसणाऱ्या प्रेमाच्या वर्षावात मी मंत्रमुग्ध झाले नाही तरच नवल! चातका इतकी निस्सीम भक्ती आणि निष्टा माझी नाही, पृथे एवढी अजोड प्रेमिका तर मी मुळीच नाही. तरीही जेंव्हा तो येतो तेंव्हा वाटते, हा माझ्यासाठीच आला आहे! सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या जाणिवांना कवेत घेऊन झुलवणारा, सुखावणारा 'पाऊस' ...आता परत येईपर्यंत हा विरह असाच त्याच्या आठवणींत चिंब भिजलेला राहाणार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment